सोलापूर जिल्हा कार्यालयात विशेष बैठक अमृतच्या योजनांमुळे येलमार समाजाला मिळणार रोजगाराची नवी दिशा;
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) सोलापूर जिल्हा कार्यालयात येलमार समाजाचे पदाधिकारी आणि 'अमृत'चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्यात अत्यंत महत्त्वपूर्ण व सकारात्मक बैठक पार पडली. या बैठकीत येलमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'अमृत'च्या माध्यमातून विविध योजना राबविण्यावर सविस्तर चर्चा झाली.
माननीय व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सोलापूर दौऱ्यावर असताना मारवाडी समाजाच्या बैठकीनंतर, येलमार समाजाचे अध्यक्ष बाळासो लाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी 'अमृत'चे कार्य कसे चालते, संस्थेच्या विविध योजना कोणत्या आहेत आणि या योजनांचा येलमार समाजाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.
व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी अमृत संस्थेचे ध्येय-धोरण, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यवसाय मार्गदर्शन आणि आर्थिक उन्नतीसाठी असणाऱ्या योजनांची अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत माहिती दिली. तसेच, येलमार समाजाचे अध्यक्ष बाळासो लाडे यांनी आपल्या समाजातील पारंपरिक व्यवसाय, सद्यस्थिती आणि अडचणी याबद्दल जोशी सरांना सविस्तर सांगितले.
येलमार समाजाचे अध्यक्ष बाळासो लाडे म्हणाले, "अमृत संस्थे मध्ये येलमार समाजाचा समावेश आहे हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. आतापर्यंत आमच्या समाजाला अशा प्रकारच्या शासकीय योजनांचा हवा तसा लाभ मिळालेला नाही. परंतु, 'अमृत'च्या योजना अत्यंत उपयुक्त व समाजाला दिशा देणाऱ्या आहेत. आम्ही या योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत उत्सुक असून, अमृत संस्थेशी कायम संपर्कात राहून समाजातील जास्तीत जास्त लोकांना जोडण्यासाठी कटिबद्ध राहू."
या सकारात्मक चर्चेमुळे येलमार समाजातील तरुण आणि उद्योजकांसाठी प्रगतीचे नवे कवाड उघडले असून, अमृत संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीला मोठी गती मिळणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment