महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत शासन संवाद सेतू’ या अभिनव उपक्रमांतर्गत बुधवार (दि. १६ सप्टेंबर) रोजी लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथील विद्यार्थ्यांनी वरोरा तहसील कार्यालयाला भेट देत महसूल विभागाच्या विविध कामकाजाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.
यावेळी मा. तहसीलदार योगेश कौटकर यांनी विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयाचे दैनंदिन कामकाज, महसूल विभागाची कार्यपद्धती तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवांची सविस्तर माहिती दिली. महसूल सहाय्यक अधिकारी यांनी उत्पन्न, जात, रहिवासी, नॉन-क्रीमीलेयर, अधिवास प्रमाणपत्र आदी विविध दाखले काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असलेल्या सेवांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीविषयी विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. त्यामुळे शासनाच्या विविध सेवा नागरिकांपर्यंत कशा पोहोचतात, प्रशासनातील विविध विभागांची भूमिका काय असते आणि शासकीय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग कसा असतो, याची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळाली. यावेळी तहसीलदार योगेश कौटकर यांनी ‘अमृत शासन संवाद सेतू’ हा विद्यार्थ्यांना शासन व्यवस्था समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम आहे, असे सांगून अमृतच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही अशा उपक्रमांना तहसील प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी लोकमान्य महाविद्यालयाचे पिलगुलवार सर, लोणकर सर, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, आदित्य सेंगर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment