विवेकानंदांचा विश्वबंधुत्वाचा विचार अक्षय प्रेरणास्रोत - प्रा. अमोल अहिरे
मालेगाव (वार्ताहर) मानवजातीच्या उत्कर्षासाठी विश्वबंधुत्वाची, विश्वधर्माची शिकवण देत, भारतीय मानवधर्माची महती आपल्या जाज्वल्य विचारातून साता समुद्रापार अमेरिकेतील शिकागो सर्वधर्मपरिषदेत विवेकानंदांनी मांडली. त्यांचा संदेश म्हणजे या महान राष्ट्राने आपल्या ध्येयाप्रती टाकलेले पहिले पाऊल होते. त्यांचे विश्वबंधुत्वाचे विचार अक्षय प्रेरणास्रोत आहेत. असे प्रतिपादन नाशिक विवेकानंद केंद्राचे माजी नगरप्रमुख तथा उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांनी केले. ते येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात विश्वबंधुत्व अमृत पंधरवडा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. अजय ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून अमृत संस्थेचे जिल्हा समन्वयक दीपक गुप्ता होते. समवेत प्राचार्य डॉ. सुभाष निकम, पर्यवेक्षक प्रा. शशीकांत भदाणे, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शासनाच्या अमृत ही स्वायत्त संस्था, विद्यार्थी कल्याण मंडळ व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुत्व पंधरवडा निमित्ताने विवेकानंदांच्या शिकागो भाषणाची लेखन स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, जाहीर व्याख्यान आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते.
यावेळी बोलताना प्रा. अहिरे म्हणालेत, महापुरुषांचे जीवन केवळ कथनासाठी नसून ते अनुकरणासाठी असते, विवेकानंद ही केवळ एक व्यक्ती नसून ती वृत्ती आहे म्हणून तिची पुनरावृत्ती शक्य आहे. मनुष्य निर्माणासाठी विवेकानंदांची वृत्ती अंगी बाणवली तर जीवन सफलतेकडून सार्थकतेकडे परावर्तित होऊन राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेला चालना मिळेल. विवेक विचारांतून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून जीवनाचे निर्माल्य देशसेवेसाठी समर्पित व्हावे असा संकल्प करावा. असे आवाहन प्रसंगी प्रा. अहिरे यांनी केले. प्रास्ताविक दीपक गुप्ता यांनी केले, परिचय, सूत्रसंचलान व आभार प्रा. महेंद्र पवार यांनी मानले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment