अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ हा उपक्रम दिनांक ०७ व ०८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन दिवस सुरू राहणार आहे. या बाजारपेठेला परभणीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजकांकडून विविध वस्तूंची खरेदी करावी, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे तसेच स्थानिक व स्वदेशी उत्पादनांना चालना द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
परभणी : परभणी येथील कौस्तुभ मंगल कार्यालयात महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेच्या वतीने स्थानिक लघुउद्योजक, स्वयंरोजगार करणारे तसेच महिला उद्योजकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मा. श्री. घनश्यामजी मालपाणी, वैश्य नागरी सहकारी बँक परभणीचे अध्यक्ष मा. श्री. सुधीर अण्णा पाटील, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय सचिव मा. श्री. विलासजी कौसडीकर, आत्मोन्नती प्रतिष्ठाणचे मा. श्री. शंकर आजेगावकर, मनपा नगरसेवक मा. श्री. रितेश झांबड, मनपा नगरसेवक मा. श्री. बबलु टाक, सेवा विभाग व उद्योजक मा. श्री. चंद्रशेखर अळनुरे तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय उपव्यवस्थापक मा. श्री. ओमकारजी शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘अमृत पेठ’ हा उपक्रम कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे लघुउद्योजकांना आपल्या उत्पादनांची थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्याची संधी मिळते, असे सांगितले. तरुणांनी व नवउद्योजकांनी व्यवसायाच्या विविध संधींचा लाभ घेऊन आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहनही मान्यवरांनी केले.
आत्मोन्नती प्रतिष्ठाणचे श्री. शंकर आजेगावकर यांनी आपल्या मनोगतात अमृत संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व प्रशिक्षणांचा पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’चे उत्कृष्ट नियोजन व आयोजन केल्याबद्दल त्यांनी परभणी अमृत टीमचे विशेष कौतुक केले.
‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’मध्ये विविध स्थानिक उत्पादने, हस्तकला वस्तू, वस्त्रप्रावरणे, आभूषणे, खाद्यपदार्थ, गौरी-गणपती सजावट साहित्य तसेच विविध घरगुती उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध वस्तूंची खरेदी करण्यासोबतच स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळत आहे.
यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, जिल्हा उपव्यवस्थापक रवि कुलकर्णी, अमृत मित्र अनंतराव जोगदंड यांच्यासह सहभागी स्टॉलधारक, उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमृत संस्थेच्या माध्यमातून उद्योजकता विकास, कौशल्य विकास, विविध प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन तसेच विविध योजनांच्या माध्यमातून युवक व उद्योजकांना सक्षम करण्याचे काम केले जाते. पात्र लाभार्थ्यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना व प्रशिक्षणांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या कौशल्याला, व्यवसायाला आणि उद्योजकीय वाटचालीला नवी दिशा द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment