अमृत संस्थेच्या योजना उपयुक्त असल्याचे मत व्यक्त
तिरोडा (जि. गोंदिया) : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लक्ष्यित गटातील समाजातून उद्योजक घडवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अनुषंगाने विविध योजनांची माहिती देण्यासाठी तिरोडा येथे ३० डिसेंबर रोजी मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या वस्तीतील जोशी वाड्यात झालेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
विविध योजनांतर्गत मिळणारे अनुदान, पात्रता निकष, अर्जप्रक्रिया, तसेच स्वयंरोजगार आणि सूक्ष्म उद्योजकतेतील संधी याबाबत या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करून उद्योजकता विकासासाठी या योजना उपयुक्त आणि प्रेरक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
या योजना राबवण्याचा उद्देश सामाजिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या बळकट उद्योजकवर्ग घडवणे हा असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या बैठकीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे सर्व मान्यवर, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांचे आयोजकांनी आभार मानले.
.....
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment