खामगाव : अमृत (AMRUT), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने लक्षित घटकातील महिलांसाठी खामगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एक महिन्याच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅचचा समारोप २५ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
खामगाव येथे अमृत ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅचचा उत्साहात समारोप खामगाव : अमृत (AMRUT), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने लक्षित घटकातील महिलांसाठी खामगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या एक महिन्याच्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅचचा समारोप २५ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या समारोप कार्यक्रमास अमरावती विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीणजी कोळेश्वर, बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्नेश कमानी, MCED चे प्रकल्प अधिकारी श्री. गणेश गुप्ता, सौ. सपना मखेजा तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना ब्युटी पार्लर व्यवसायाशी संबंधित विविध व्यावसायिक व कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात आले. एक महिन्याचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वतःचा ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगारासोबत इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीणजी कोळेश्वर यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना मार्गदर्शन करताना, प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करून केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. ब्युटी पार्लर व्यवसायामध्ये मोठ्या संधी असून योग्य नियोजन, गुणवत्ता आणि उत्तम ग्राहकसेवेच्या माध्यमातून महिला आपला व्यवसाय यशस्वीपणे उभा करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्नेश कमानी यांनी उपस्थितांना AMRUTच्या विविध उपक्रमांची तसेच महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास, उद्योजकता विकास, प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी AMRUTच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच MCED चे प्रकल्प अधिकारी श्री. गणेश गुप्ता यांनी महिलांना उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, अनुदान व सबसिडी योजनांची माहिती देत प्रशिक्षणानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध आर्थिक सहाय्याचा योग्य प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी महिलांनी प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या अनुभवांविषयी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणाच्या यशस्वी समारोपामुळे खामगाव परिसरातील महिलांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबन व स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकता आले आहे.
अधिक माहितीसाठी : श्री. जिग्नेश कमानी जिल्हा व्यवस्थापक, AMRUT, बुलढाणा मो. 9112227637 AMRUT जिल्हा कार्यालय रूम क्र. 305, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment