नायगावच्या शासकीय ITI मध्ये अमृत संस्थेचा 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रम संपन्न; राष्ट्रपुनर्निर्माणात 'Gen Z' चा सहभाग वाढवण्यावर भर
नायगावच्या शासकीय ITI मध्ये अमृत संस्थेचा 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रम संपन्न; राष्ट्रपुनर्निर्माणात 'Gen Z' चा सहभाग वाढवण्यावर भर
नायगाव: -परमवीरचक्र विजेते कॅप्टन गुरुबचनसिंह सलारिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), नायगाव येथे अमृत संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज 'अमृत युवा ऊर्जा' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील १६ ते २५ वयोगटातील युवाशक्तीशी (Gen Z) थेट संवाद साधून त्यांच्या भावना, प्रेरणास्थाने समजून घेणे आणि त्यांच्यात घटनात्मक मूल्ये रुजवून राष्ट्रपुनर्निर्माणात सक्रिय सहभागी करून घेणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर आणि उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी 'अमृत युवा ऊर्जा' उपक्रमाची पार्श्वभूमी व त्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर आयटीआय नायगावचे आयएमसी (IMC) सदस्य श्री. सदानंद चुटेवाट यांनी युवक-युवतींशी संवाद साधत राष्ट्राप्रती असणारी कर्तव्ये आणि नीतिमूल्यांचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी आयएमसी सदस्य श्री. लक्ष्मण बुद्धलवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून, त्यांनी अमृत संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
युवा केंद्रित विविध विषयांवर रंगला संवाद: - या कार्यक्रमांतर्गत युवकांमधील नेतृत्वगुण व सामाजिक जबाबदारी जागृत करण्यासाठी खालील प्रमुख ७ विषयांवर आधारित विशेष संवादसत्र आयोजित करण्यात आले होते.
* युवा रक्तदान शिबीर: सामाजिक आरोग्यासाठी रक्तदानाचे महत्त्व. * युवा भारत - स्वच्छ भारत: परिसराच्या स्वच्छतेत तरुणांचा सहभाग. * यंग इंडिया – फिट इंडिया: शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी. * नशामुक्त युवा भारत: व्यसनाधीनतेविरुद्ध युवकांचा लढा. * रिस्पॉन्सिबल युवा (सामाजिक कर्तव्य): समाजातील जबाबदार नागरिक म्हणून भूमिका. * मेरा भारत महान: देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची जाणीव. * आपत्ती व्यवस्थापन: संकटसमयी तरुणांचे नियोजन व मदत.
या माध्यमातून तरुणांना आपले विचार मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. अनेक युवक-युवतींनी या विषयांवर अत्यंत स्पष्टपणे आपली मनोगते व्यक्त करत भविष्यात देशसेवेसाठी व सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प केला.
नियोजन, सूत्रसंचालन व उपस्थिती: - या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट व नेटके नियोजन अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक श्री. विश्वेश्वर जोशी यांनी केले होते.
कार्यक्रम प्रसंगी मोटार मेकॅनिक निदेशक श्रीमती बडे यांनी विषयांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तर जोडारी निदेशक कु. पांचाळ यांचीही विशेष उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन जोडारी निदेशक श्री. निंबाळकर यांनी केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Yashraj Pawale
Ko
Write a Comment