नायगाव येथे ‘अमृत उद्योग कौशल्य वर्धन’ प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ; नवीन उद्योजक घडवण्यावर भर
नायगाव येथे ‘अमृत उद्योग कौशल्य वर्धन’ प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ; नवीन उद्योजक घडवण्यावर भर
नायगाव: - युवक-युवतींमध्ये उद्योजकतेची भावना रुजवून नवीन उद्योजक घडवणे आणि सध्या सुरू असलेल्या व्यवसायांची वृद्धी करण्यासाठी आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्ये आत्मसात करून देणे, या उद्देशाने अमृत संस्थेच्या वतीने आयोजित ‘अमृत उद्योग कौशल्य वर्धन प्रशिक्षण’ (EDP) कार्यक्रमाचा गुरुवारी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी नायगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) अत्यंत दिमाखात शुभारंभ झाला.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे अमृत संस्था, नांदेडच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख उद्घाटक म्हणून शासकीय औ. प्र. संस्थेचे प्राचार्य श्री. पांडुरंग अन्नपूर्णे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. सदानंद चुटेवाट व श्री. लक्ष्मण बुद्धलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत नांदेड जिल्ह्याचे व्यवस्थापक श्री. सौरभ माळहिप्परगेकर यांनी या उद्योजकता विकास प्रशिक्षणाची (EDP) सविस्तर माहिती व रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली, तर उपव्यवस्थापक यांनी अमृत संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे स्वरूप स्पष्ट केले.
आजच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शक तथा प्रशिक्षक म्हणून पंचतारांकित एमआयडीसी कृष्णूर येथील उर्वी स्टील कंपनीचे मालक आणि आयटीआय कॉलेजचे अध्यक्ष श्री. रोहित वडगावकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतःच्या व्यावसायिक प्रवासातील अनुभवांतून 'व्यवसायाची सुरुवात ते व्यवसायातील स्थैर्य' याविषयी अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत सखोल मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोडारी निदेशक श्री. निंबाळकर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडले. पहिल्याच दिवशी मिळालेल्या मोलाच्या आणि व्यावहारिक मार्गदर्शनामुळे उपस्थित युवक-युवतींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या उपयुक्त व दिशादर्शक उपक्रमाबद्दल प्रशिक्षणार्थींनी अमृत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार, हिंदू लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment