महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या ‘अमृत पराक्रम दिना’च्या पार्श्वभूमीवर सुतावणे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला भेट देण्यात आली. अमृत मित्र रामेश्वर साळुंखे यांनी शिक्षकांना निबंध, वक्तृत्व व रील स्पर्धेची माहिती देत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी अमृतच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली असून, युवकांसाठी कॉलेजमध्ये आगामी काळात विविध कार्यक्रम घेण्यास मुख्याध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
वैजापूर : सुतावणे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वैजापूर येथे ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. अमृतच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त १ ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
थोरले बाजीराव पेशवे हे हिंदवी साम्राज्याच्या इतिहासातील एक अपराजित योद्धा, धाडसी सेनानी आणि कुशल युद्धनीतीकार म्हणून ओळखले जातात. आपल्या शौर्य, वेगवान युद्धतंत्र आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. त्यांच्या पराक्रमाची आणि युद्धकौशल्याची गाथा आजही अभिमानाने सांगितली जाते. हाच शौर्यवान इतिहास आणि राष्ट्रनिष्ठेची ओळख नवीन पिढीला व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
याच अनुषंगाने सुतावणे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला भेट देऊन निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि रील स्पर्धेची माहिती देण्यात आली. अमृत मित्र रामेश्वर साळुंखे यांनी कॉलेजमधील उपस्थित सर्व प्राध्यापक व शिक्षकांना या स्पर्धांची सविस्तर माहिती दिली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे आणि आपल्यातील कला, विचार व कौशल्य दाखवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तसेच अमृतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण आणि उपक्रमांची माहितीही शिक्षकांना देण्यात आली. युवा वर्गासाठी आगामी काळात कॉलेजमध्ये अमृतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रम घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली. या कार्यक्रमांसाठी कॉलेजच्या मुख्याध्यापकांनी सकारात्मक प्रतिसाद देत परवानगी दिली.
थोरले बाजीराव पेशवे यांचे जीवन, त्यांचे शौर्य, पराक्रम आणि युद्धकौशल्य विद्यार्थ्यांना व युवकांना समजावे, यासाठी अमृतच्या वतीने विविध ठिकाणी विशेष व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येत आहे.
या भेटीदरम्यान अमृत मित्र रामेश्वर साळुंखे यांचे कॉलेजमधील शिक्षक वृंदांनी स्वागत केले. यावेळी रोहन कुलकर्णी, सुधीर सुतावणे, प्रकाश कुलकर्णी, रमेश बुबणे आणि बाळकृष्ण कचकर यांची उपस्थिती होती.
संपर्क : 7391065475 / 9403200606
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment