अमृतच्या विविध योजना, प्रशिक्षण आणि उद्योजकतेच्या संधींची माहेश्वरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. समाजातील महिला, युवती आणि तरुणांना अमृतच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा मिळावा, यासाठी योजनांचा समाजात मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृतच्या विविध योजना आणि उपक्रम समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहेश्वरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक घेण्यात आली.
ही बैठक पुरुषोत्तमदास दूधखडकी, जिल्हा कार्यकारणी सदस्य व माजी प्रभाग प्रमुख, महेशनगर यांच्या ऑफिसमध्ये घेण्यात आली. यावेळी माहेश्वरी समाजाचे जिल्हाध्यक्ष अजित नावंदर, शहराध्यक्ष सुनील मालानी, प्रभाग प्रमुख देवेन लड्डा आणि सतीश कारवा यांच्यासह समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अमृतच्या वेगवेगळ्या योजना, प्रशिक्षण आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणाऱ्या संधींबद्दल माहिती देण्यात आली. अमृतचे मराठवाडा विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी विविध योजनांची माहिती दिली. तसेच जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे आणि उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी अमृतच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल आणि त्याचा फायदा कसा घेता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
अमृतच्या योजना समजल्यानंतर माहेश्वरी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनांचा आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार करण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत अमृतच्या योजना पोहोचाव्यात, यासाठी लवकरच समाजाची मोठी बैठक घेऊन प्रत्येक घरापर्यंत माहिती पोहोचवण्याचे ठरवण्यात आले.
विशेष करून महिला आणि युवतींनी अमृतच्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि आपल्या पायावर उभे राहावे, यासाठी समाजाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. माहेश्वरी समाजाच्या या पुढाकारामुळे अमृतच्या योजना आणि प्रशिक्षणाची माहिती आणखी मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचणार असून, तरुण, महिला आणि युवतींना व्यवसायाच्या नव्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
संपर्क : 7391065475 / 9403200606
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment