मालेगावात स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ, ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी.
मालेगावात २२ ते २४ ऑगस्टदरम्यान अमृतपेठ थेट बाजारपेठ एक्झिबिशन -भव्य उद्योजक मेळाव्याचे आयोजन मालेगाव : स्थानिक व्यावसायिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ या भव्य उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उद्योजक मेळावा दि. २२, २३ व २४ ऑगस्ट २०२६ रोजी मालेगाव कॅम्प येथील बालगंधर्व मंगल कार्यालय, सोमवार बाजार येथे आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचा उद्घाटन समारंभ शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, अमृतचे राज्य समन्वयक दिपकजी जोशी तसेच नाशिक विभाग प्रमुख मंगेशजी खाडीलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. मेळाव्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार असून, सामाजिक संस्था, व्यापारी व उद्योजक प्रतिनिधी तसेच अमृत परिवारातील पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
स्थानिक उद्योजकांना व्यासपीठ, ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदीची संधी ‘अमृतपेठ’च्या माध्यमातून स्थानिक उद्योजक, महिला उद्योजक, लघुउद्योजक व विविध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्राहकांना विविध उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने या प्रदर्शनाला मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. मालेगाव परिसरातील नागरिकांनी या तीन दिवसीय उद्योजक मेळाव्यास मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे व ‘स्थानिकांसाठी स्थानिक’ उत्पादनांना पसंती द्यावी, असे आवाहन केले आहे .
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment