बीबीएन फाउंडेशनच्या ५२७ व्या साप्ताहिक बैठकीत अमृतच्या विविध योजना, प्रशिक्षण आणि व्यवसायवाढीच्या संधींची सविस्तर माहिती देण्यात आली. विभागीय व्यवस्थापक अमित सामंत व जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
छत्रपती संभाजीनगर : बीबीएन फाउंडेशनची ५२७ वी साप्ताहिक बैठक शुक्रवारी (२१ ऑगस्ट) उस्मानपुरा येथील श्रीनिधी हॉलमध्ये उत्साहात पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विविध योजना, प्रशिक्षण आणि व्यवसायवाढीच्या संधींची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या वेळी अमृतचे विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनीही अमृतच्या विविध योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि पुढील टप्प्यांबाबत मार्गदर्शन केले. अमृततर्फे राबविण्यात येणाऱ्या ड्रोन प्रशिक्षण, अमृत बेकरी, अमृत सूर्यमित्र (सोलार इन्स्टॉलेशन टेक्निशियन), आयात-निर्यात प्रशिक्षण, अमृतपेठ, ईव्ही चार्जिंग स्टेशन, अमृत सक्षम (घनकचरा व्यवस्थापन), अमृत ग्लॅमर (ब्युटी पार्लर), शैक्षणिक योजना, व्याज परतावा योजना आणि अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण (ईडीपी) याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. तसेच अमृत शासन युवा संवाद आणि अमृत कुटुंब संवाद या उपक्रमांचीही माहिती देण्यात आली.
“व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा सुरू असलेला व्यवसाय पुढे न्यायचा असेल, तर अमृत तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास अमित सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. व्यवसायवाढीसाठी योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपलब्ध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. लाभार्थ्यांनी सांगितला अमृतचा प्रत्यक्ष फायदा बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे अमृतच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. अभिजीत कुलकर्णी, प्रथमेश खडके, ऋग्वेद कुलकर्णी, तुषार कडतू, अंजली मुळे, मयूर कुलकर्णी आणि मंथन पुराणिक यांनी व्याज परतावा, ड्रोन प्रशिक्षण आणि ईडीपी प्रशिक्षणामुळे त्यांना झालेल्या फायद्यांची माहिती दिली. लाभार्थ्यांच्या अनुभवातून अमृतच्या योजनांचा प्रत्यक्ष व्यवसायात कसा उपयोग होतो, याची उपस्थितांना स्पष्ट कल्पना आली. यावेळी बीबीएन फाउंडेशनच्या वतीने या लाभार्थ्यांचे स्वागतही करण्यात आले. बीबीएन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य अमृतच्या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात आणि व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना या योजनांची माहिती मिळावी, यासाठी बीबीएन ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष पुढाकार घेत सहकार्य केले. त्यांनी अमृतच्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी निमंत्रित करून उपस्थित सदस्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये सागर बोरुळकर, शैलेश कुलकर्णी, जितेंद्र राहुरीकर, सीए मंथन पुराणिक, निलेश सातोनकर, अनंत साठे, संतोष जोशी, डॉ. स्वप्निल पाटनुरकर, राजेश्वरराव पेरूमला, लक्ष्मीकांत पांडे, कमलाकर हटेकर आणि दिपाली सातरकर यांचे सहकार्य लाभले. अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७५ / 9403200606 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Pramod joshi
Most useful information
Thanks Atulji and All teams members
Write a Comment