अमरावती येथे १५ ऑगस्ट रोजी माननीय विजयजी जोशी सर यांच्या हस्ते ‘अमृत मिनी मार्ट’चे उद्घाटन करण्यात आले.
अमरावती येथे १५ ऑगस्ट रोजी माननीय विजयजी जोशी सर यांच्या हस्ते ‘अमृत मिनी मार्ट’चे उद्घाटन करण्यात आले. अमृतच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या मिनी मार्टची सुरुवात करण्यात आली आहे. ‘अमृत मिनी मार्ट’च्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास मदत होणार असून, ग्राहकांना विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या व्यवसायाला चालना मिळून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास हातभार लागणार आहे. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या माध्यमातून युवक व नागरिकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले. अमृतच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असेही यावेळी सांगण्यात आले. ‘अमृत मिनी मार्ट’ हा केवळ विक्रीचा उपक्रम नसून स्थानिक उद्योजकांना बाजारपेठेशी जोडणारा आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा उपक्रम रोजगारनिर्मिती आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 2 Comments
Omkar bolte
अमृत मार्ट अतिउत्तम चांगली संकल्पना आहे
आनंद ओक
अमूर्त पेठ विभागीय कार्यालयामार्फत अमरावती सिटी आणि जिल्हा मिनी मॉल ओपिंग करून दिला आहे. अमूर्त पेठ च्या अमरावती ह्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो. आमच्या निर्मिती केलेल्या उत्पादनात जागा मिळून दिल्या बदल धन्यवाद. अमूर्त पेठ ने महाराष्ट्रात सर्व जिह्यातील गावात राबविण्यात यावा ही विनंती करीत आहे.
Write a Comment