४५ विद्यार्थ्यांनी घेतली शासकीय कार्यालयांच्या कार्यपद्धतीची प्रत्यक्ष माहिती
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागांची कार्यपद्धती, प्रशासनाची रचना आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रम अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात भारतीय ज्ञानपीठ कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मूर्तिजापूर येथील ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेतली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक प्रक्रिया तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी याबाबत अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन महसूल विभागाचे कामकाज, विविध प्रकारची प्रमाणपत्रे, जमीन अभिलेख तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवांची माहिती जाणून घेतली.
यानंतर पंचायत समिती कार्यालयाच्या भेटीदरम्यान ग्रामीण विकास, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तसेच विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा, सायबर गुन्हे व त्यापासून बचाव, वाहतूक व्यवस्थापन तसेच पोलीस विभागाच्या दैनंदिन कामकाजाविषयी माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले.
प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयाची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, नागरिकांसाठी उपलब्ध सेवा आणि शासन व्यवस्थेतील विभागाची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शासकीय कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज जवळून पाहता आल्याने विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाची कार्यपद्धती समजून घेण्याबरोबरच अनेक नवीन बाबी शिकण्याची संधी मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या उपक्रमास उपविभागीय अधिकारी अपार, निवासी नायब तहसीलदार गिरिजादेवी लोखंडे, नायब तहसीलदार रवी राऊत, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, दामिनी पथकाच्या रोहिणी प्रकाश शिरभाते, भारतीय ज्ञानपीठ कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश नागोराव कुलकर्णी तसेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे अकोला जिल्हा उपव्यवस्थापक गणेश मुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांना शासन यंत्रणा केवळ पुस्तकातून न समजता तिचे प्रत्यक्ष कामकाज अनुभवता यावे आणि प्रशासनाविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२७६३६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment