अमृतच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी विविध ८०० जागा UPSC, MPSC, SSC, बँकिंग, TET, अभियांत्रिकी, न्यायिक सेवा व पोलीस-मिलिटरी भरतीचा समावेश; CETद्वारे निवड, २३ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत-
लातूर, दि. १९ : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील अमृतच्या लक्षित गटातील युवक-युवतींसाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमार्फत पूर्व प्रशिक्षणासह विद्यावेतन, आकस्मिक खर्च आणि प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय साहाय्य देण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत एकूण ८०० उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा, संयुक्त गट-ब, संयुक्त गट-क, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, कर्मचारी निवड आयोग (SSC), बँकिंग परीक्षा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तसेच पोलीस व मिलिटरी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
परीक्षानिहाय ८०० जागा
या योजनेंतर्गत UPSC नागरी सेवा परीक्षा (दिल्ली) ३०, UPSC नागरी सेवा परीक्षा (महाराष्ट्र) ३०, MPSC राज्यसेवा १७५, MPSC अभियांत्रिकी सेवा २५, MPSC न्यायिक सेवा २५, MPSC संयुक्त गट-ब १७५, MPSC संयुक्त गट-क १७५, SSC २५, बँकिंग ७०, पोलीस व मिलिटरी भरती २० आणि TET ५० अशा एकूण ८०० जागा उपलब्ध आहेत.
विद्यावेतनासह प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
प्रशिक्षणाच्या प्रकारानुसार पात्र लाभार्थ्यांना दरमहा ६ हजार ते १३ हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन, १० हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत आकस्मिक खर्च तसेच ४० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्कासाठी शासकीय सहाय्य देण्यात येणार आहे. UPSC दिल्ली प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १० हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे. विद्यावेतनाचा लाभ घेण्यासाठी संबंधित प्रशिक्षणामध्ये किमान ७५ टक्के उपस्थिती आवश्यक राहणार आहे.
अमृतच्या लक्षित गटातील युवकांना संधी
या योजनेसाठी अमृतच्या लक्षित गटातील ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी पात्र घटकांतील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक असून, तो खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. संबंधित स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच यापूर्वी कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून संबंधित प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा.
CETद्वारे गुणवत्तेनुसार निवड
प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test - CET) मधील गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. एकूण जागांपैकी ३० टक्के जागा महिलांसाठी, ५ टक्के दिव्यांगांसाठी आणि १ टक्का अनाथ उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षित प्रवर्गातील जागा रिक्त राहिल्यास त्या नियमानुसार सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत.
एका लाभार्थ्यास एका आर्थिक वर्षात एकाच प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार असून, आयुष्यात जास्तीत जास्त दोन वेळा प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
२३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून २३ ऑगस्ट २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा.
ऑनलाइन अर्जासाठी लिंक :
https://amrutcet2026.cbtexam.in/JEST/index.html
तसेच महाअमृतच्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरही अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तांत्रिक अडचणीसाठी हेल्पडेस्क
अर्ज भरताना कोणत्याही लाभार्थ्यास तांत्रिक अडचण अथवा Error आल्यास, संबंधित Error चा Screenshot सोबत घेऊन पुढील माध्यमांवर संपर्क साधता येईल.
ई-मेल : amrutcet2026helpdesk@gmail.com
हेल्पलाईन : 022-65475009
हेल्पलाईनची वेळ : सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत करिअर करण्याची तयारी करणाऱ्या पात्र युवक-युवतींसाठी ही महत्त्वपूर्ण संधी असून, लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतीपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन अमृतच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
शुभम मुळजकर
जिल्हा व्यवस्थापक,लातूर
अमृत कार्यालय,लातूर
संपर्क क्रमांक- 7391065470
पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment