भंडारा जिल्हा कार्यालयात अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या भंडारा जिल्हा कार्यालयात दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी अपराजित योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, नेतृत्वगुण, राष्ट्रनिष्ठा आणि अद्वितीय युद्धनीतीचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ओमकार हरदास यांनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये बाजीराव पेशवे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पराक्रम, दूरदृष्टी आणि प्रभावी युद्धनीतीच्या बळावर त्यांनी मराठा साम्राज्याचा उत्तरेकडे विस्तार घडवून आणला. रणांगणात एकही लढाई न हरलेले सेनानी म्हणून त्यांचे नाव इतिहासात आदराने घेतले जाते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचे स्मरण केले. त्यांच्या कार्यातून नेतृत्व, संघटन कौशल्य, ध्येयाप्रती निष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे ही काळाची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा, बहुभाषिक ब्राह्मण सभा, विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, अमृतमित्र, अमृतसखी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या कार्याला अभिवादन करून करण्यात आली. उपस्थितांनी त्यांच्या पराक्रमाचा आदर्श समोर ठेवून समाज आणि राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
अधिक माहितीसाठी संपर्क : ओमकार मिलिंदराव हरदास जिल्हा व्यवस्थापक- ९११२२२८७७५
जिल्हा कार्यालय पत्ता : श्री साई किराणा घराच्या बाजूला,शास्त्री नगर,स्टेशन रोड, भंडारा – ४४१९०४ ई-मेल : amrut.bhandara.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 2 Comments
Priya Pathak
Khup chhan mahiti sadar keleli ahe.
Mahatvapurn ahe.
Pranita Joshi
Khup chhan mahiti ahe.
Write a Comment