नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगरूप देण्यासाठी ‘अमृत’च्या वतीने इन्क्युबेशन योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला चालना देण्यासाठी ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी ‘मॅजिक’ इन्क्युबेशन सेंटरला भेट देऊन विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्सबाबत चर्चा केली.
नावीन्यपूर्ण उद्योगसंधींना ‘अमृत’ची चालना
व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजय जोशी यांची ‘मॅजिक’ इन्क्युबेशन सेंटरला भेट
सिल्लोड : नावीन्यपूर्ण कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करून युवकांना उद्योजकतेकडे वळविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या वतीने इन्क्युबेशन योजना राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी विविध इन्क्युबेशन सेंटर्सशी सहकार्य करण्यावर ‘अमृत’कडून भर दिला जात आहे.
याच अनुषंगाने ‘अमृत’चे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजय जोशी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मॅजिक (Marathwada Accelerator for Growth & Incubation Council) इन्क्युबेशन सेंटरला भेट दिली. यावेळी रिन्युएबल एनर्जी, वैद्यकीय, कृषी तसेच इतर क्षेत्रांमध्ये नवीन स्टार्टअप सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नव्या तंत्रज्ञानाचा वापर, स्टार्टअपला आवश्यक असलेले मार्गदर्शन तसेच ‘मॅजिक’च्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
‘अमृत’च्या माध्यमातून युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे यावेळी कौतुक करण्यात आले. तसेच ‘मॅजिक’च्या वतीने व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
१८० हून अधिक स्टार्टअपना मार्गदर्शन
छत्रपती संभाजीनगर येथील ‘मॅजिक’ हे मराठवाड्यासह देशातील उद्योजकता, नवोपक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विविध १५ क्षेत्रांतील १८० हून अधिक स्टार्टअपना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन व सर्वांगीण सहाय्य करण्यात आले आहे.
नवउद्योजकांना कल्पनेपासून प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पायाभूत सुविधा, नेटवर्किंग, बाजारपेठेशी जोडणी तसेच शासकीय व आर्थिक योजनांशी जोडण्याचे काम ‘मॅजिक’च्या माध्यमातून केले जाते.
‘मॅजिक’च्या माध्यमातून आतापर्यंत १८० हून अधिक स्टार्टअप, १,५०० हून अधिक रोजगाराच्या संधी आणि ३७५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल साध्य झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे नवकल्पनांना उद्योगाच्या रूपात विकसित करण्यासाठी ‘मॅजिक’चे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी ‘अमृत’चे राज्यव्यवस्थापक दीपक जोशी, मराठवाडा विभागाचे व्यवस्थापक अमित सामंत, उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्हा टीमचे अधिकारी व कर्मचारी तसेच ‘मॅजिक’चे पदाधिकारी उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क : 7391065475, 9403200606
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment