अकोला येथे अकोला गौरव सन्मान सोहळ्यात इतिहास अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत यांचा विशेष सन्मान

सन्मानमूर्ती इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचा विशेष सन्मान; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती व आदर्श कुटुंबांचा गौरव

अकोला येथे अकोला गौरव सन्मान सोहळ्यात  इतिहास अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत यांचा विशेष सन्मान  मुख्य फोटो
अकोला येथे अकोला गौरव सन्मान सोहळ्यात  इतिहास अभ्यासक मा.जगन्नाथ लडकत यांचा विशेष सन्मान  अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), अकोला यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित ‘अकोला गौरव सन्मान’ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे सन्मानमूर्ती ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व व्याख्याते मा. श्री. जगन्नाथ लडकत यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गड-किल्ले भ्रमंती, राष्ट्रसेवा, एकत्र कुटुंब पद्धती व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबांचा गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजय जोशी होते. तर सन्मानमूर्ती म्हणून मा. श्री. जगन्नाथ लडकत, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महानगर अध्यक्ष मा. श्री. अतुल पाटील, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष देशपांडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह मा. श्री. अजय नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


इतिहास अभ्यासक व प्रभावी व्याख्याते मा. श्री. जगन्नाथ लडकत यांनी इतिहासाच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. पराक्रम दिनानिमित्त जगन्नाथ लडकत यांनी मराठवाडा व विदर्भातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांच्या जीवनकार्यावर व्याख्याने दिली. या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पराक्रम, शौर्य, युद्धनीती आणि इतिहासातील त्यांचे अतुलनीय योगदान पोहोचविण्याचे कार्य केले.


यावेळी जगन्नाथ लडकत यांनी ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ या विषयावर विशेष व्याख्यान दिले. थोरले बाजीराव पेशवे यांचे शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी, युद्धकौशल्य आणि भारतीय इतिहासातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर त्यांनी प्रभावीपणे प्रकाश टाकला. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला. भूषण बापट यांचा गड-किल्ले भ्रमंती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सन्मान करण्यात आला. तसेच मुकुंद पाध्ये यांना ‘राष्ट्रसेवा गौरव’ देऊन सन्मानित करण्यात आले. आर्मी वेल्फेअर फंडासाठी त्यांनी एक कोटी रुपयांचे योगदान दिल्याबद्दल त्यांच्या राष्ट्रसेवेचा विशेष गौरव करण्यात आला.


आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अभ्यंकर कुटुंब, मिश्रा कुटुंब आणि पाटील कुटुंब यांना ‘आदर्श कुटुंब’ म्हणून सन्मानित करण्यात आले. कुटुंबातील एकोपा, संस्कार, परस्पर सहकार्य आणि एकत्र कुटुंब पद्धती जपल्याबद्दल या कुटुंबांचा गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृतचे अकोला जिल्हा उपव्यवस्थापक गणेश मुळे यांनी केले. त्यांनी अमृत संस्थेची उद्दिष्टे तसेच कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.


याच कार्यक्रमात अमृतमार्फत आयोजित करण्यात आलेले ३० दिवसीय ब्युटी पार्लर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक कौशल्य देऊन स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विजय जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या माध्यमातून युवक-युवतींना सक्षम करण्यासोबतच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा सन्मान सोहळ्यांमधून समाजातील चांगले कार्य समोर येते आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा पाठक यांनी केले. यावेळी सन्मानमूर्ती मा. श्री. जगन्नाथ लडकत, मा. श्री. अतुल पाटील, मा. श्री. सुभाष देशपांडे आणि मा. श्री. अजय नवघरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, प्रशिक्षणार्थी, महिला, युवक-युवती आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


कर्तृत्वाचा गौरव, राष्ट्रसेवेचा सन्मान, एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श, इतिहासाचे प्रेरणादायी स्मरण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन अशा विविध पैलूंमुळे ‘अकोला गौरव सन्मान’ सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 02:19 PM News publication time | Views: 1,317 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 18-08-2026 News publication date | Time: 02:19 PM News publication time | Views: 1,317 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

भूषण बापट
18-08-2026 07:02 PM

खुप सुंदर आखीव-रेखीव कार्यक्रम झाला.🙏

Write a Comment
0 / 50 words
Advertisement