सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी घेतला सहभाग
पेण : मुंबईतील उद्योग संचालनालय आणि अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्हा उद्योग केंद्राने २३ डिसेंबरला पेण येथील गांधी मंदिरात उद्योजकता कार्यशाळा घेतली होती. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी घेतला.
सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींच्या व्यवसायाला चालना देणे, तसेच आर्थिक साह्याबाबत माहिती उपलब्ध करून देणे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती समाजातील व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम अमृत संस्थेमार्फत वेळोवेळी करण्यात येते. कार्यशाळेत अमृत संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक योजनेचा लाभ कसा घ्यायचा, त्या योजनांचा योग्य वापर करून आर्थिक उन्नती कशी साधता येईल, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment