अमृत व बीबीएनए बीडच्या संयुक्त उपक्रमातून नवउद्योजकांना मिळाले प्रभावी व्यासपीठ
बीड : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि बीबीएनए बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला "श्रावण महोत्सव २०२६" हा दोन दिवसीय भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा उत्साहात संपन्न झाला. दि. १४ व १५ ऑगस्ट रोजी अमृत मंगल कार्यालय, बीड येथे आयोजित या महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर भेटी दिल्या व स्थानिक उद्योजकांना भरभरून प्रतिसाद दिला.
महोत्सवाचे उद्घाटन जनीजनार्दन संस्थानचे मठाधिपती श्री विनायक महाराज पाटांगणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा मा.आ.अमरसिंह पंडित यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उद्योजक मनोज पाठक, ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जोशी, वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अजिंक्य पांडव, उद्योजक श्रीनिवास कुलकर्णी, मिलिंद जोशी, बाळासाहेब थिगळे, बीबीएनएचे समन्वयक मुकुंद कुलकर्णी, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मुळे व भावना मुळे यांनी केले. प्रारंभी बीबीएनएचे समन्वयक डॉ. धनंजय रामदासी यांनी बीबीएनएच्या कार्याची माहिती दिली, तर अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी अमृतच्या विविध योजना, कौशल्य विकास, उद्योजकता विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विनायक महाराज पाटांगणकर यांनी उपस्थितांना आशीर्वादपर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात अमरसिंह पंडित यांनी अशा प्रकारचे उपक्रम केवळ शहरापुरते मर्यादित न राहता तालुका व ग्रामीण भागापर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगितले. ग्रामीण भागातील उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि बँकांच्या कर्जवाटप प्रक्रियेत अधिक सकारात्मकता आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांमुळे नवउद्योजकांना प्रेरणा मिळते, स्थानिक उद्योगांना चालना मिळते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त होते, असे ते म्हणाले.
दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात महिला उद्योजक, गृहोद्योग, लघुउद्योग, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक तसेच विविध व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांनी सहभाग घेतला होता. कपडे, कृत्रिम दागिने, पूजा साहित्य, घरगुती खाद्यपदार्थ, मसाले, गृहउपयोगी वस्तू, हस्तकला, सौरऊर्जा उत्पादने तसेच विविध सेवांशी संबंधित माहिती नागरिकांसाठी उपलब्ध होती. श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच एकाच ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळाल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्यामुळे सहभागी उद्योजकांनाही चांगला प्रतिसाद मिळाला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भाजप गटनेत्या व नगरसेविका सारिका क्षीरसागर, पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप खिस्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह अतुल घोरड, अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे, नगरसेविका भाग्यश्री देशपांडे, महेश वाघमारे आणि विकास उमापूरकर यांनी महोत्सवाला भेट देऊन सहभागी उद्योजकांना शुभेच्छा दिल्या.
याच प्रसंगी अमृत संस्थेमार्फत आयोजित आरीवर्क प्रशिक्षण आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांमुळे नवउद्योजकांना व्यासपीठ मिळत असल्याचे सांगत आयोजनाचे कौतुक केले.
महोत्सवात सहभागी झालेल्या उद्योजकांनी या उपक्रमामुळे आपल्या व्यवसायाची ओळख अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्याची भावना व्यक्त केली. अनेक नवीन ग्राहक, व्यावसायिक संपर्क आणि संधी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः महिला उद्योजकांनी अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास वाढत असल्याचे नमूद केले. व्यवसायातील स्पर्धेपेक्षा सहकार्य अधिक महत्त्वाचे असल्याचा संदेशही या महोत्सवातून अधोरेखित झाला.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी बीबीएनएचे समन्वयक डॉ. धनंजय रामदासी, मुकुंद कुलकर्णी, संदीप मुळे, सागर कुलकर्णी, पंकज गोले, सुयोग खजानदार, सुमित कुलकर्णी, सिद्धेश्वर रामदासी, भावना मुळे, कविता जोशी, डॉ. अमृता देशपांडे आणि भक्ती कास्तीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी, बीड जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी, लातूर जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी आणि अमृत मित्र सुमित धिरडे यांनीही या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ, नवउद्योजकांना नवे व्यासपीठ, महिला उद्योजकांना संधी आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध उत्पादने व सेवांची सुविधा उपलब्ध करून देणारा हा श्रावण महोत्सव बीडमधील उद्योजकता विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला, अशी भावना सहभागी उद्योजक, ग्राहक आणि नागरिकांनी व्यक्त केली.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४६८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment