चंद्रपूरच्या लोकमान्य टिळक विद्यालयात घुमला बाजीरावांच्या पराक्रमाचा जयघोष- मा. जगन्नाथ लडकत यांचे प्रभावी व्याख्यान

वेगवान हालचाली, अचूक रणनीती आणि अद्वितीय युद्धकौशल्याच्या बळावर शत्रूला नामोहरम करणारे थोरले बाजीराव पेशवे हे भारतीय इतिहासातील अजिंक्य नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. पालखेडच्या रणांगणात त्यांनी दाखविलेली युद्धनीती, दूरदृष्टी आणि निर्णयक्षमता आजच्या पिढीसाठीही नेतृत्वाचा मौल्यवान धडा ठरते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते श्री. जगन्नाथ लडकत यांनी केले.

चंद्रपूरच्या  लोकमान्य टिळक विद्यालयात घुमला बाजीरावांच्या पराक्रमाचा जयघोष- मा. जगन्नाथ लडकत यांचे प्रभावी व्याख्यान मुख्य फोटो
चंद्रपूरच्या  लोकमान्य टिळक विद्यालयात घुमला बाजीरावांच्या पराक्रमाचा जयघोष- मा. जगन्नाथ लडकत यांचे प्रभावी व्याख्यान अतिरिक्त फोटो

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत लोकमान्य टिळक विद्यालय तथा महाविद्यालय, चंद्रपूर आणि महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ‘अजिंक्य योद्धे थोरले बाजीराव पेशवे आणि पालखेडची लढाई’ या विषयावर श्री. जगन्नाथ लडकत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख वक्ते श्री. जगन्नाथ लडकत, लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सचिव श्री. राहुल सराफ, प्राचार्य श्री. प्रफुल्ल राजपुरोहित तसेच अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. आदित्य सेंगर उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. पदलमवार सर तसेच शाळा व महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सचिव श्री. राहुल सराफ यांनी भारतीय इतिहासलेखनाच्या संदर्भातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. त्यांनी बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमासोबतच त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि राष्ट्राच्या विस्तारासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. यानंतर प्रमुख वक्ते श्री. जगन्नाथ लडकत यांनी थोरले बाजीराव पेशवे यांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि हिंदवी साम्राज्याच्या विस्तारासाठी त्यांनी राबविलेल्या विविध मोहिमांवर सविस्तर प्रकाश टाकला. प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी इतिहासातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांसमोर जिवंत केले. पालखेडच्या लढाईचा संदर्भ देताना लडकत यांनी बाजीरावांच्या रणनीतीतील वेग, अचूक नियोजन आणि शत्रूच्या हालचालींचा पूर्वानुमान घेण्याच्या क्षमतेवर विशेष भर दिला. पारंपरिक पद्धतीने केवळ समोरासमोर युद्ध करण्याऐवजी परिस्थितीनुसार रणनितीमध्ये बदल करण्याची बाजीरावांची दूरदृष्टी त्यांच्या विजयामागील महत्त्वाचा घटक होती, असे त्यांनी स्पष्ट केले. बाजीरावांच्या युद्धनीतीचे विविध पैलू स्पष्ट करताना त्यांनी ‘वेग हेच बाजीरावांच्या युद्धनीतीचे सर्वात मोठे सामर्थ्य होते’, असे सांगून त्यांच्या मोहिमांमागील नियोजन आणि धाडसी निर्णयक्षमता विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. कमी वेळेत मोठे अंतर पार करून शत्रूला अनपेक्षितपणे घेरणे, उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणे या बाबी आजच्या तरुणांनीही आत्मसात कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. बाजीरावांच्या पराक्रमाचे वर्णन करताना श्री. लडकत यांनी विद्यार्थ्यांना इतिहासाकडे केवळ पाठ्यपुस्तकातील विषय म्हणून न पाहता त्याचे सखोल अध्ययन, चिंतन आणि मनन करावे, असे आवाहन केले. इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्यातून नेतृत्व, निर्णयक्षमता, धैर्य, नियोजन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या व्याख्यानाला लोकमान्य विद्यालायतील सुमारे ३०० विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, युद्धकौशल्य आणि नेतृत्वगुणांची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच संबंधित आयोजकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना भारतीय इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देत त्यांच्या कार्यातून नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनंत देहनकर सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विक्रमजी पांडे यांनी केले. यावेळी अमृत मित्र श्रीरंग खोंड व अमृत मित्र सतीश नारायनदास उपस्थित होते.

अधिक माहिती साठी संपर्क - 9112228774 अमृत चंद्रपूर जिल्हा कार्यालय पत्ता - कृष्णा टावर जवळ, गुरुद्वारा रोड तुकूम, चंद्रपूर अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 14-08-2026 News publication date | Time: 12:54 PM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 14-08-2026 News publication date | Time: 12:54 PM News publication time | Views: 89 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

R
Rushikesh bhau bolte
14-08-2026 04:08 PM

अतिशय महत्वाचे मुद्दे ठेवले हो लढकत जी वा... अमृत मध्ये असे खूब हिरे आहेत की अख्या महाराष्ट्राला गाजवंत आहेत

Write a Comment
0 / 50 words
Advertisement