हिंगोली व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी अमृत कार्यालयास सदिच्छा भेट देऊन राज्यस्तरीय ‘अमृत पराक्रम दिन’ निबंध, वक्तृत्व व रील्स स्पर्धांबाबत चर्चा केली.
हिंगोली : हिंगोली व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी आज अमृत कार्यालय, हिंगोली येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘अमृत पराक्रम दिन’ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या निबंध, वक्तृत्व व रील्स स्पर्धांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार व संरक्षण करताना हिंदवी साम्राज्याचा झेंडा उत्तरेपर्यंत दिमाखात फडकविणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम, युद्धनीती, राष्ट्रनिष्ठा व प्रभावी नेतृत्वाचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उदात्त उद्देशाने या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांमध्ये विविध गटांसाठी विभागनिहाय आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती व प्रसार करण्यावर यावेळी चर्चा झाली.
‘अमृत पराक्रम दिन’ उपक्रमाचा व्यापक प्रसार व्हावा आणि अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी हिंगोली व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत सकारात्मक व फलदायी चर्चा झाली. व्यापारी संघटनेने या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment