अमृतच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘अमृत पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. अमृतच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘अमृत पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
थोरले बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक अपराजित योद्धा, धाडसी सेनानी आणि कुशल युद्धनीतीकार म्हणून ओळखले जातात. अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या शौर्य, वेगवान युद्धतंत्र आणि दूरदृष्टीच्या जोरावर मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. त्यांच्या पराक्रमाची आणि युद्धकौशल्याची गाथा आजही इतिहासात अभिमानाने सांगितली जाते.
याच शौर्यवान इतिहासाची आणि राष्ट्रनिष्ठेची ओळख नवीन पिढीला व्हावी, यासाठी अमृतच्या वतीने १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांसह युवकांना सहभागी करून घेतले जात आहे. तसेच थोरले बाजीराव पेशवे यांचे जीवन, त्यांचे शौर्य, पराक्रम आणि युद्धकौशल्य सर्वांना समजावे, यासाठी विविध ठिकाणी विशेष व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येत आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सरस्वती भुवन प्रशाला, छत्रपती संभाजीनगर येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. इतिहास तज्ज्ञ व व्याख्याते मा. जगन्नाथजी लडकत यांनी विद्यार्थ्यांना थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमी इतिहासाची माहिती दिली.
थोरले बाजीराव पेशवे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या धाडस, नेतृत्व आणि युद्धकौशल्याच्या जोरावर अनेक लढायांमध्ये विजय मिळवला. पालखेडच्या युद्धातील त्यांचा पराक्रम, वेगवान हालचाली आणि अचूक युद्धनीती हा इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून शौर्य, नेतृत्व, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले.
या कार्यक्रमाला अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृत मित्र रामेश्वर साळुंके, अमृतसखी मंजू कुलकर्णी आणि रुचा शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सरस्वती भुवन प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ तसेच प्रशालेच्या संपूर्ण टीमने विशेष सहकार्य केले. अधिक माहितीसाठी संपर्क :- 73912065475 / 9403200606 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment