इतिहास तज्ज्ञ आणि अभ्यासक मा. जगन्नाथ लडकत यांच्या माध्यमातून समजला आपल्या अपराजित योद्ध्यांचा खरा इतिहास
छत्रपती संभाजीनगर:- इतिहासात काही योद्धे असे असतात की, त्यांचे नाव घेतले तरी शौर्य, धाडस आणि पराक्रम डोळ्यासमोर उभा राहतो. अशाच अपराजित योद्ध्यांपैकी एक म्हणजे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. त्यांच्या शौर्याची, पराक्रमाची आणि राष्ट्रनिष्ठेची माहिती आजच्या पिढीला व्हावी, यासाठी शरणापूर फाटा, वंजारवाडी येथील ओंकार विद्यालयात ‘अमृत पराक्रम दिना’निमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. अमृतच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस राज्यभर ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, यासाठी राज्यभरात १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसह युवकांना सहभागी करून घेतले जात आहे. तसेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि पराक्रम सर्वांना माहीत व्हावा, यासाठी विविध ठिकाणी व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ओंकार विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी हे विशेष व्याख्यान घेण्यात आले.
यावेळी इतिहास तज्ज्ञ आणि अभ्यासक मा. जगन्नाथ लडकत यांनी विद्यार्थ्यांना थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग सांगितले. बाजीराव पेशव्यांनी आपल्या धाडसाने, वेगवान युद्धनीतीने आणि जबरदस्त नेतृत्वाने अनेक लढायांमध्ये विजय मिळवला. विशेषतः पालखेडच्या ऐतिहासिक युद्धाची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या आणि रंजक पद्धतीने सांगण्यात आली.
बाजीराव पेशव्यांचा इतिहास हा फक्त युद्धांचा इतिहास नाही, तर त्यामागे असलेले धाडस, नेतृत्व, निर्णय घेण्याची क्षमता आणि राष्ट्रासाठी काम करण्याची जिद्द आजच्या तरुणांनी समजून घेणे गरजेचे आहे, असा संदेशही या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
इतिहास हा फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नसतो, तर इतिहासातील पराक्रमी व्यक्तींच्या जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी असतो, ही भावना या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली.
या कार्यक्रमाला अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, पालखेडचे डॉ. नंदकिशोर जाधव पाटील, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, अमृत मित्र रामेश्वर साळुंखे, अमृतसखी मंजू कुलकर्णी आणि रुचा शर्मा, तसेच ओंकार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता भाले, उपमुख्याध्यापक नागेश जोशी यांच्यासह विद्यालयातील शिक्षक आणि संपूर्ण टीम उपस्थित होती. अधिक माहितीसाठी संपर्क :- 73912065475 / 9403200606
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment