अमृतच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत संवाद सेतू’ या उपक्रमांतर्गत विश्वभारती विद्यालय, कारंजा येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय, कारंजा लाड येथे भेट देऊन प्रशासकीय कामकाजाची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.
नागरिकांच्या मनातील प्रशासनाबाबतचा दुरावा कमी करणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शासन व्यवस्था, प्रशासनाचे कार्य आणि विविध शासकीय कार्यालयांच्या कामकाजाविषयी ज्ञान व जागरूकता निर्माण करणे, हा ‘अमृत संवाद सेतू’ उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ निर्माण करण्यात येत आहे.
तहसील कार्यालयाच्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कार्यालयातील विविध विभागांचे कामकाज, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, शासकीय योजनांची अंमलबजावणी, विविध दाखले व प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया तसेच महसूल प्रशासनाची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत उत्सुकतेने विविध प्रश्न विचारले. नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, विविध दाखले व प्रमाणपत्रे, शासकीय योजना तसेच महसूल विभागाच्या कार्याबाबत विद्यार्थ्यांनी जिज्ञासेने प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून उपस्थित अधिकारीही प्रभावित झाले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
यावेळी तहसीलदार रवी महाले, नायब तहसीलदार अनिल वाडेकर तसेच सामान्य आस्थापना विभागाच्या संगीता काळसरपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रश्न विचारण्याची पद्धत पाहून तहसीलदार रवी महाले यांनी ‘अमृत संवाद सेतू’ या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासन हे केवळ शासकीय कार्यालयांपुरते मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचा थेट संबंध असतो, हे विद्यार्थ्यांना या संवादातून समजावून सांगण्यात आले. प्रत्यक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त अमृत पराक्रम दिन- निबंध व वक्तृत्व स्पर्धेची दिली माहिती- या भेटीच्या निमित्ताने अमृतच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आणखी एका उपक्रमाचेही अनावरण करण्यात आले. अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृत पराक्रम दिनांतर्गत विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाचे अनावरण तहसीलदार रवी महाले यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दलची जिज्ञासा, वक्तृत्वकौशल्य, लेखनकौशल्य तसेच नेतृत्वगुण विकसित व्हावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदार रवी महाले यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. शाळेचे मुख्याध्यापक परेशसिंह ठाकूर यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. शाळेतील विद्यार्थी निबंध व वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या उपक्रमात विश्वभारती विद्यालय, कारंजा येथील इयत्ता दहावीचे एकूण ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसोबत शाळेचे मुख्याध्यापक परेशसिंह ठाकूर तसेच सौरभ तोमर, श्रवण किन्हीकर आणि कृष्णा भिवरकर हे शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेण्याची, अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची आणि आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची संधी मिळाल्याने ‘अमृत संवाद सेतू’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, संवादात्मक आणि अनुभवाधारित ठरला. प्रशासन आणि समाजातील, विशेषतः युवा पिढीमधील संवाद अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२७६३४
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment