अमृत संवाद सेतू उपक्रम उत्साहात संपन्न; जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. निखिल पाटील यांचे मार्गदर्शन.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने लातूर येथे आयोजित 'अमृत संवाद सेतू' उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची रचना, विविध विभागांचे कार्य, शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती, अर्ज व निवेदन लेखन, पाठपुरावा प्रक्रिया, ऑनलाइन शासकीय सेवा तसेच जबाबदार नागरिक म्हणून पार पाडावयाच्या कर्तव्यांविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्र, लातूरचे महाव्यवस्थापक श्री. निखिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रशासनाची रचना, शासकीय कार्यालयांचे कार्य, शासनाशी प्रभावी संवाद कसा साधावा, नागरिकांनी आपले अधिकार व कर्तव्ये कशी पार पाडावीत तसेच जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका कशी बजावावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांनी विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. यानंतर अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. शुभम मुळजकर यांनी ' अमृत संवाद सेतू' उपक्रमाची संकल्पना व उद्दिष्टे स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी प्रशासन समजून घेत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात तसेच समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. अमृतच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास, उद्योजकता, जनजागृती आणि नागरिक सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) चे प्रकल्प अधिकारी श्री. दीपक गायकवाड यांनी उद्योजकता, कौशल्य विकास, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशासनाविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये शासनाविषयी विश्वास, जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ झाली. यावेळी जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी, अमृत मित्र श्री. अमित पांडे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा उपव्यवस्थापक श्री. चिंतेश जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमृत मित्र श्री. अमित पांडे यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी जागरूकता निर्माण करून सक्षम, सजग आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. "प्रशासन समजून घ्या... जबाबदार नागरिक बना!" हा संदेश देत कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७०
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment