महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या 'अमृत शासन संवाद सेतू' या उपक्रमांतर्गत गुरुवार (दि. ६ ऑगस्ट) रोजी एम. जे. एफ. विद्यालय व महाविद्यालय, बल्लारपूर येथील विद्यार्थ्यांनी बल्लारपूर तहसील कार्यालयाला भेट देऊन महसूल विभागाच्या विविध कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.
यावेळी मा. तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी तहसील कार्यालयाचे दैनंदिन कामकाज, महसूल विभागाची कार्यपद्धती तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवांची माहिती दिली. मा. नायब तहसीलदार महेंद्र फुलजले यांनी उत्पन्न, जात, रहिवासी, नॉन-क्रीमीलेयर आदी विविध दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व ऑनलाइन सेवांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून प्रशासनाच्या कार्यपद्धतीची सखोल माहिती जाणून घेतली. यावेळी तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी 'अमृत शासन संवाद सेतू' हा विद्यार्थ्यांना शासन व्यवस्था समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगत अमृतच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही अशा उपक्रमांना तहसील प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी एम. जे. एफ. विद्यालय व महाविद्यालयाचे मोहितकर सर, साखरकर सर व लाभे सर, अमृतचे जिल्हा व्यवस्थापक विक्रम मोहन पांडे, जिल्हा उपव्यवस्थापक आदित्य सेंगर, अमृत मित्र सतीश नारायणदास तसेच श्रीरंग खोंड उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क- 91122 28774
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment