तरुणांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, अमृत युवा संवादात कृषी अधिकारी श्री मनोज पाटील यांचे आवाहन
परांडा (धाराशिव):
येथे 'अमृत संवाद' अंतर्गत 'युवा संवाद ' या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कृषी अधिकारी श्री मनोज पाटील, अमृत जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी यांच्यासह परिसरातील शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान कृषी अधिकारी श्री मनोज पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे काळाची गरज आहे. तरुण पिढीने कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणि ॲग्री-स्टार्टअप्सच्या माध्यमातून पुढाकार घेतल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते."
यावेळी कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला. ड्रोनमुळे कमी वेळेत, कमी खर्चात आणि मानवी आरोग्याला कोणताही धोका न पोहोचवता औषध फवारणी करणे शक्य होते. तसेच पिकांची पाहणी, खत व्यवस्थापन आणि पाण्याचे नियोजन यासाठी ड्रोन अत्यंत प्रभावी ठरत असून, यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाचतो, असेही श्री मनोज पाटील यांनी स्पष्ट केले.
तसेच अमृत जिल्हा व्यवस्थापक चिन्मय कुलकर्णी व अमृत मित्र रवि वैद्य उपस्थित होते.श्री चिन्मय कुलकर्णी यांनी 'अमृत युवा संवाद' या उपक्रमाची भूमिका स्पष्ट करत, ग्रामीण भागातील तरुण व शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधी, कृषी उद्योजकता आणि रोजगाराबाबत सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमात परिसरातील शेतकरी व विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमात आधुनिक शेती पद्धती, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर, शेतीपूरक व्यवसाय, माती परीक्षण आणि शासकीय अनुदाने या विषयांवर थेट संवाद साधण्यात आला. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शेतकरी व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी- ७३९१०६५४६९
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment