अमृत संस्थेच्या अमरावती जिल्हा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांचा हस्ते गौरव

ध्वजदिन निधी संकलन मोहिमेविषयी जनजागृतीचे कार्य

अमृत संस्थेच्या अमरावती जिल्हा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांचा हस्ते गौरव मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या अमरावती जिल्हा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांचा हस्ते गौरव अतिरिक्त फोटो

अमरावती : ध्वजदिन निधी संकलन मोहिमेविषयी जनजागृतीच्या कार्याला हातभार लावल्याबद्दल अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांचा नुकताच जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

देशासाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन केले जाते. याकरिता सन २०२४-२५ या वर्षासाठी अमरावती जिल्ह्याला एक कोटी २३ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र नागरिक, सामाजिक संस्था, उद्योजक व विविध घटकांच्या उत्स्फूर्त सहभागातून तब्बल एक कोटी ६३ लाख रुपयांचा विक्रमी निधी संकलित करण्यात यश आले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अमरावती विभागात अमरावती जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

या यशाबद्दल सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. ध्वजदिन निधी संकलन मोहिमेला बळ देण्यासाठी ज्यांचे योगदान आहे, त्यांना अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) आनंद पाथरकर (सेना मेडल) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यात अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर यांचाही समावेश होता. समाजमाध्यमांच्या माध्यमातून आणि कोणतेही मानधन न घेता सैनिकांप्रति कृतज्ञतेची भावना जनमानसात पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल गोगरकर आणि सुप्रसिद्ध रीलस्टार प्रज्ञा राऊत यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे ध्वजदिन निधी संकलन मोहिमेला मोठे बळ मिळाले, असे या वेळी नमूद करण्यात आले.
देशसेवेच्या या उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून, भविष्यातही देशहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 28-12-2025 News publication date | Time: 01:40 PM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 28-12-2025 News publication date | Time: 01:40 PM News publication time | Views: 83 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words