बुलडाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरा’मध्ये अमृतने प्रभावी सहभाग नोंदविला. शिबिरात अमृतच्या दालनाला युवक, महिला, नवउद्योजक आणि स्वयंरोजगार इच्छुक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरा’त अमृतचा प्रभावी सहभाग कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या योजनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बुलढाणा, दि. ३ : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर हे शिबीर राबवले जात आहे. त्याअंतर्गत बुलडाण्यातील आराध्या लॉन्स येथे हे शिबीर पार पडले.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विविध योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी आणि उद्योजकता विकास उपक्रमांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’मध्ये अमृतने प्रभावी सहभाग नोंदविला. शिबिरात अमृतच्या दालनाला युवक, महिला, नवउद्योजक आणि स्वयंरोजगार इच्छुक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या योजना व सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. याचबरोबर अमृतच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहिती नागरिकांना प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आली. अमृतच्या प्रतिनिधींनी पात्रता, अर्ज प्रक्रिया, प्रशिक्षणाच्या संधी, स्वयंरोजगारासाठी उपलब्ध उपक्रम तसेच उद्योजकता विकास कार्यक्रम याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. युवक व महिलांनी विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती घेतली. प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या संधींबाबतही नागरिकांनी माहिती जाणून घेतली. अनेक इच्छुक लाभार्थींनी आगामी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. या शिबिरामुळे अमृतच्या योजनांचा थेट जनसंपर्काच्या माध्यमातून प्रभावी प्रचार-प्रसार झाला. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांसोबतच अमृतच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकासाच्या संधी नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, तहसीलदार विठ्ठल कुंभरे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते. आमदार संजय गायकवाड यांनी अशा शिबिरामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचत असून विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळत असल्याचे सांगितले. शासनाच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अमृतच्या माध्यमातून ‘प्रशिक्षणातून प्रगती आणि उद्योजकतेतून आत्मनिर्भरता’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवक व महिलांना सक्षम करणे, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे या दृष्टीने अमृतच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment