जालना येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षणात(EDP) ई-कॉमर्स व 'अमृत पेठ'या महत्वपूर्ण उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी "ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म (ऑनलाइन अमृत पेठ) व अमृत पेठ थेट बाजारपेठ" या विषयावर जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना खेकाळे यांनी सांगितले की, 'अमृत पेठ' हा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी राज्य, देश तसेच जागतिक स्तरावरील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून देतो. डिजिटल माध्यमातून उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याने व्यवसायाचा विस्तार, विक्रीत वाढ आणि नव्या ग्राहकांपर्यंत सहज पोहोचणे शक्य होते. त्यामुळे उद्योजकांना स्वतःची हक्काची ऑनलाइन बाजारपेठ निर्माण करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
तसेच 'अमृत पेठ थेट बाजारपेठ' ही संकल्पना स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, गृहउद्योग तसेच लघुउद्योजकांना प्रत्यक्ष ग्राहकांशी संवाद साधण्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देते. प्रदर्शनाच्या स्वरूपात आयोजित करण्यात येणाऱ्या या बाजारपेठेत सहभागी झाल्यामुळे उत्पादनांची थेट विक्री, व्यवसायाची ओळख, ब्रँड निर्मिती तसेच ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यास मोठी मदत होते.
याशिवाय अशा प्रदर्शनांमध्ये सहभागी झाल्याने इतर उद्योजकांचे व्यवसाय, बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहकांच्या बदलत्या गरजा व विक्रीतील संधी यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. ग्राहकांचा अभिप्राय, संपर्क माहिती (डेटा) आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन उत्पादन व सेवांमध्ये आवश्यक सुधारणा करता येतात. यामुळे ग्राहक समाधान वाढून व्यवसायाच्या वृद्धीस चालना मिळते.
उद्योजकांनी आपल्या उत्पादनांचा अधिकाधिक प्रसार करण्यासाठी तसेच व्यवसायाचा विस्तार साधण्यासाठी ऑनलाइन विक्रीबरोबरच थेट बाजारपेठ व प्रदर्शनांमध्ये नियमित सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी यावेळी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३०२८३०५८
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment