मालेगाव येथे दि. ०२ ऑगस्ट रोजी अमृत उद्योजकता विकास कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन; बँक कर्ज प्रक्रिया व शासकीय योजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
मालेगाव, दि. २ : उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) चे उद्घाटन ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार पाठक, माहेश्वरी समाजाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक श्री. उन्मेष (बंडू) माहेश्वरी तसेच निवृत्त बँक अधिकारी श्री. दिलीप भागचंद बोथरा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक श्री. दीपक गुप्ता यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. अजिंक्य कन्नल यांनी करून दिला. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या तांत्रिक सत्रात "बँक कर्ज व शासकीय योजना" या विषयावर श्री. दिलीप भागचंद बोथरा यांनी मार्गदर्शन केले. सिंडिकेट बँकेत १७ वर्षे शाखाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्री. बोथरा यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत कर्ज प्रस्ताव तयार करण्यापासून ते कर्ज मंजुरीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत स्पष्ट केली. किसान क्रेडिट कार्ड तसेच अनुसूचित जाती-जमातींसाठीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल त्यांना नाशिक जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाचा सन्मानही प्राप्त झाला आहे. यावेळी त्यांनी उद्योग सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षणाचे महत्त्व, बँक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, अनुदानित योजना, बँक अधिकाऱ्यांशी प्रभावी संवाद कसा साधावा, तसेच प्रकल्प अहवाल व सादरीकरण (Presentation) प्रभावीपणे कसे मांडावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सत्राच्या शेवटी प्रशिक्षणार्थींनी स्टॅम्प ड्युटी, क्रेडिट लोन, आयकर विवरणपत्र (ITR), सीए प्रमाणित कागदपत्रे आदी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. श्री. बोथरा यांनी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. या संवादात्मक सत्रामुळे प्रशिक्षणार्थींना उद्योग उभारणी, बँक कर्ज प्रक्रिया आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले व्यावहारिक ज्ञान मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment