स्वदेशी जागरण मंचाच्या स्वावलंबी भारत अभियानांतर्गत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह मा. श्री. धनंजयजी धामणे यांनी अमृत संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी अमृतवर्गासह विविध लोकहितकारी उपक्रम सादर केले. अमृतचे कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत धनंजयजींनी शाळांमध्ये अमृतवर्ग सुरू करण्यासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
स्वावलंबी भारत अभियानात अमृतच्या कार्याचे कौतुक. छत्रपती संभाजीनगर : स्वदेशी जागरण मंच, देवगिरी प्रांत यांच्या स्वावलंबी भारत अभियानांतर्गत आयोजित वर्गाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह मा. श्री. धनंजयजी धामणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था ‘अमृत’चे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी धनंजयजी धामणे यांची सदिच्छा भेट घेत अमृतमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहितकारी उपक्रमांची माहिती दिली. वैयक्तिक व्याज परतावा योजना, कचरा व्यवस्थापन, ईव्ही चार्जिंग स्टेशन, फ्रूट मार्केट उभारणी तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, नेतृत्वगुण, शारीरिक विकास आणि भारतीय पारंपरिक खेळांद्वारे घडविण्यात येणाऱ्या अमृतवर्ग उपक्रमाची कार्यपद्धती त्यांनी सविस्तर मांडली.
अमृतवर्गाची संकल्पना जाणून घेतल्यानंतर मा. श्री. धनंजयजी धामणे यांनी अमृतच्या कार्याचे कौतुक करत, “अमृतचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून अशा उपक्रमांतून संस्कारक्षम, स्वावलंबी आणि सक्षम भारत घडण्यास निश्चितच बळ मिळेल,” असे मत व्यक्त केले.
तसेच त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अमृत टीमचे अभिनंदन करून शहरातील विविध शाळांमध्ये अमृतवर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. “या कार्यासाठी केव्हाही संपर्क करा, मी सदैव तुमच्या सोबत आहे,” असे सांगत त्यांनी उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दर्शविला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment