अमृतचे जिल्हा व्यवस्थापक योगेश जोशी यांनी नागरिकांना केले मार्गदर्शन
रिसोड : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देण्यासाठी आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानांतर्गत रिसोड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या आणि दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अमृतच्या वतीने खुल्या प्रवर्गातील नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला व उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहाय्य व कौशल्य विकासाच्या संधी, युवकांसाठी प्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रम, तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेला चालना देणाऱ्या विविध योजनांविषयी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक, वाशिम श्री. योगेश जोशी यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
अमृतच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने हे शिबिर नागरिकांसाठी उपयुक्त ठरले.
शासनाच्या योजना आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असून, अमृतच्या विविध योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक, वाशिम श्री. योगेश जोशी यांनी यावेळी केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment