अमृत संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'अमृत संवाद सेतू ' या उपक्रमासंदर्भात अचलपूर येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी श्री. बळवंत अरखराव यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अमृत अमरावती जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ऋषिकेश कथलकर यांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.
'अमृत संवाद सेतू ' या उपक्रमाचा मुख्य उद्देश अकरावी व बारावीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती प्रत्यक्ष अनुभवता यावी हा आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध शासकीय कार्यालयांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असून, कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय प्रक्रिया, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्यक्ष अधिकाऱ्यांकडून मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी जागरूकता निर्माण होण्यास, शासकीय यंत्रणेची प्रत्यक्ष ओळख होण्यास तसेच भविष्यातील करिअरविषयक दृष्टीकोन अधिक व्यापक होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उपविभागीय अधिकारी श्री. बळवंत अरखराव यांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment