अमृतचं मोफत EDP प्रशिक्षण; उद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी, ५ ऑगस्टपर्यंत नोंदणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उद्योग करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी अमृततर्फे १० दिवसांचं मोफत उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे.

अमृतचं मोफत EDP प्रशिक्षण; उद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी, ५ ऑगस्टपर्यंत नोंदणी मुख्य फोटो
अमृतचं मोफत EDP प्रशिक्षण; उद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी, ५ ऑगस्टपर्यंत नोंदणी अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : स्वतःचा धंदा सुरू करायचा असेल, उद्योग वाढवायचा असेल किंवा नोकरीऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, तर अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) तर्फे राबविण्यात येणारं उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षण मोठी संधी ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती आणि लाभार्थ्यांनी ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत नाव नोंदणी करून या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन अमृत जिल्हा कार्यालयाने केलं आहे.

हे प्रशिक्षण १० ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार असून एकूण १० दिवसांचं असेल. सुरुवातीचे चार दिवस अमृतच्या विभागीय व जिल्हा कार्यालयात दररोज दोन तास प्रत्यक्ष (ऑफलाइन) प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतरचे सहा दिवस ऑनलाइन मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला शासकीय प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.

या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची सुरुवात कशी करायची, व्यवसायाचं योग्य नियोजन कसं करायचं, भांडवल आणि बँक कर्ज कसं मिळवायचं, शासनाच्या विविध योजना आणि अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा, मार्केटिंग, ब्रँडिंग, ट्रेडमार्क, उद्योग व्यवस्थापन, नफा-तोटा, आर्थिक नियोजन, उद्योगासाठी लागणारी कागदपत्रं, कच्चा माल कुठून घ्यायचा, तयार मालाची विक्री कशी करायची आणि बाजारपेठ कशी शोधायची, याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसंच अमृत पेठ या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्वतःच्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री कशी करायची, याचीही माहिती प्रशिक्षणात दिली जाणार आहे. त्यामुळे लघुउद्योग, सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, ट्रेडिंग तसेच स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे.

अमृतच्या माध्यमातून यापूर्वी अनेक युवक-युवतींनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे उद्योग सुरू केले असून अनेक जण यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचं स्वप्न असलेल्या इच्छुकांनी ही संधी न दवडता ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत नाव नोंदणी करून १० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असं आवाहन अमृत जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करण्यात आलं आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 06:07 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 06:07 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement