स्पर्धेच्या वाढत्या युगात केवळ शैक्षणिक पदवी मिळविणे पुरेसे राहिलेले नाही. रोजगाराच्या बदलत्या गरजा लक्षात घेता कौशल्य, आत्मविश्वास, प्रभावी संवाद आणि योग्य करिअर नियोजन यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. हीच गरज ओळखून अमृत (AMRUT) तर्फे 'अमृत संवाद सेतू' हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शिक्षण, उद्योग, प्रशासन आणि समाज यांच्यात प्रभावी संवादाचे सेतू उभारून युवक-युवतींना करिअरविषयक योग्य दिशा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षांची तयारी, करिअर नियोजन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, उद्योग-व्यवसाय, स्टार्टअप आणि विविध शासकीय योजनांची माहिती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून दिली जाणार आहे.
यासोबतच बदलत्या रोजगार बाजारपेठेत आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी सखोल माहिती देऊन प्रत्येकाच्या आवडी, क्षमता आणि ध्येयांनुसार योग्य करिअरची निवड करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, यशस्वी उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या संवादातून नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होईल.
'अमृत संवाद सेतू' हा केवळ मार्गदर्शन कार्यक्रम नसून सर्वांगीण विकासासाठी उभारलेला प्रभावी संवाद मंच आहे. या माध्यमातून भविष्यकालीन संधींची ओळख, रोजगारक्षम कौशल्यांचा विकास आणि स्वयंरोजगारासाठी प्रेरणा मिळणार असून सक्षम, आत्मनिर्भर व राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देणारी युवा पिढी घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयांनी आणि युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा अमृत कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ९११२२२८७७४
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment