हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकारातून 'अमृत शासन विद्यार्थी संवाद सेतू' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हिंगोली, दि. २८ : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या पुढाकारातून आज जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील सभागृहामध्ये 'अमृत शासन विद्यार्थी संवाद सेतू' उपक्रम उत्साहात पार पडला. शासन आणि विद्यार्थी यांच्यात प्रभावी संवाद निर्माण करून विद्यार्थ्यांना विविध शासकीय विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
या उपक्रमात आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय विभागांच्या कार्यपद्धती, कार्यालयीन कामकाज, शासकीय योजना, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी निवडणूक विभाग, जिल्हा उद्योग केंद्र (DIC), महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या विभागाचे कार्य, कार्यालयीन कामकाज, विविध शासकीय योजना, नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधा, कौशल्य विकास प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी यांची सविस्तर माहिती दिली.
याशिवाय विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, अर्ज सादर करण्याची पद्धत तसेच विभागामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. शासनाच्या विविध विभागांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद घडवून आणत त्यांच्यामध्ये शासकीय योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'अमृत शासन विद्यार्थी संवाद सेतू' उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment