कागदी पिशवी खरोखरच पर्यावरणपूरक आहे का? झाडे, पाणी आणि कार्बन उत्सर्जनाचे वास्तव सांगणारा हा लेख-
एका हातात कागदी पिशवी आणि मनात ‘मी पर्यावरणासाठी योग्य निर्णय घेतोय’ अशी भावना… प्लास्टिकच्या वाढत्या प्रदूषणामुळे आज अनेक ग्राहक कागदी पिशव्यांकडे वळत आहेत. प्लास्टिकबंदी, पर्यावरणाविषयी वाढलेली जागरूकता आणि बाजारपेठेतील बदल यामुळे कागदी पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, कागदी पिशवी खरोखरच पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे का? तिच्या निर्मितीपासून ते विल्हेवाटीपर्यंतचा प्रवास पाहिला, तर त्यामागेही काही पर्यावरणीय आव्हाने आहेत. नुकताच जागतिक कागदी पिशवी दिवस साजरा झाला, त्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.
कागदी पिशव्या प्रामुख्याने लाकडाच्या लगद्यापासून किंवा पुनर्वापरित कागदापासून तयार केल्या जातात. पुनर्वापरित कागदाचा वापर केल्यास नवीन झाडांची गरज कमी होते. मात्र, नव्या कागदासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड आवश्यक असल्याने वनसंपत्तीवरील दबाव वाढू शकतो.
कागद निर्मिती प्रक्रियेत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. लगदा तयार करणे, कागदाचे पत्रे बनवणे आणि ब्लीचिंग यासाठी पाणी आवश्यक असते. एका टन कागदी लगद्यासाठी साधारण २० हजार ते ६० हजार लिटरपर्यंत पाणी लागू शकते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यात रसायने, तंतू आणि ब्लीचिंग घटक असू शकतात. योग्य प्रक्रिया न झाल्यास हे घटक जलस्रोतांमध्ये मिसळून जलचर परिसंस्थेवर परिणाम करू शकतात.
कागद निर्मिती ही ऊर्जा-केंद्रित प्रक्रिया असल्याने कार्बन उत्सर्जनही होते. उत्पादनादरम्यान सल्फर ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म कण यांसारखे प्रदूषक हवेत मिसळू शकतात. शाई, कोटिंग आणि चिकट पदार्थांच्या वापरामुळे कागदी पिशव्यांचा पर्यावरणीय ठसा आणखी वाढतो.
कागदी पिशवी ही प्लास्टिकला पर्याय आहे; पण ती पूर्णपणे पर्यावरणीय परिणाममुक्त नाही. खरा पर्यावरणपूरक मार्ग म्हणजे कमी वापर, वारंवार पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट हा आहे. एखाद्या वस्तूला पर्यावरणपूरक म्हणण्यापूर्वी तिच्या संपूर्ण जीवनचक्राचा विचार करणे गरजेचे आहे. कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, वापर आणि पुनर्वापर या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात.
- पूजा सोनसाळे, पर्यावरण अभ्यासक
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment