महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या उद्यम कौशल्य वर्धन (EDP) प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी बँकिंग विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. देवगिरी नागरी सहकारी बँकेचे मार्केटिंग हेड श्री. भरत पुंडलिकराव म्हस्के यांनी व्यवसायासाठी बँक कर्ज कसे मिळवावे, कर्ज प्रस्ताव कसा तयार करावा, बँकेशी कसा संपर्क ठेवावा तसेच CMEGP आणि PMEGP यांसारख्या शासकीय योजनांची माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या अमृत उद्यम कौशल्य वर्धन (EDP) प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी 'बँकिंग' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. या सत्रासाठी श्री. भरत पुंडलिकराव म्हस्के हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. देवगिरी नागरी सहकारी बँकेत त्यांनी ३२ वर्षे सेवा केली असून सध्या ते मार्केटिंग हेड म्हणून काम पाहत आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अक्षय लंबे यांनी श्री. भरत म्हस्के यांचं स्वागत केलं. तसेच अमृतच्या जिल्हा टीमने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पूर्ण सहकार्य केलं. यावेळी व्यवसाय सुरू करायचा असेल तर बँकेकडून कर्ज कसं घ्यायचं, बँकेत जाताना कोणती कागदपत्रं लागतात, प्रोजेक्ट कसा तयार करायचा, बँकेच्या अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं, कर्ज मंजूर होण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याबद्दल सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. याशिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP ) या शासकीय योजनांची माहितीही देण्यात आली. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment