अमृत उद्यम लघु प्रशिक्षणात ई-कॉमर्सद्वारे व्यवसायवृद्धीचे मार्गदर्शन अमृत पेठ व विविध योजनांची लाभार्थ्यांना सविस्तर माहिती दिली गेली.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या अमृत उद्यम लघु प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाचा तिसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उद्योजकता विकास, आधुनिक व्यवसाय पद्धती आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ यावर भर देण्यात आलेल्या या प्रशिक्षणात लाभार्थ्यांना विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी अमृत पेठ थेट बाजारपेठ (ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म) या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. बदलत्या काळात व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर अपरिहार्य बनला असून, स्थानिक उत्पादने ऑनलाइन बाजारपेठेत उपलब्ध करून देत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी या प्लॅटफॉर्ममुळे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमृतच्या जिल्हा टीमने संपूर्ण सेशनदरम्यान पूर्ण सहकार्य केले. उत्पादनांची ऑनलाइन नोंदणी, डिजिटल विपणन, ग्राहकांशी संवाद, ऑर्डर व्यवस्थापन तसेच गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. ग्रामीण भागातील तसेच नवउद्योजकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून व्यवसायात स्पर्धात्मकता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास व रोजगाराभिमुख योजनांचीही माहिती दिली. शासकीय योजनांचा योग्य लाभ घेतल्यास कमी भांडवलातही यशस्वी उद्योग उभारणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग सुरू करण्यापूर्वी व्यवसाय नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
प्रशिक्षणादरम्यान लाभार्थींनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. आधुनिक उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले डिजिटल कौशल्य, बाजारपेठेतील संधी आणि व्यवसाय विस्ताराच्या विविध बाबींची माहिती मिळाल्याने प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले.
अमृतच्या या उद्योजकता विकास प्रशिक्षणामुळे नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळत असून, रोजगार मागणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment