वीर बाल दिवसानिमित्त आयटीआय आणि अमृतच्या नांदेड शाखेने राबवला उपक्रम
नायगाव (जि. नांदेड) : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि अमृत संस्थेचे नांदेड कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (२६ डिसेंबर) वीर बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संकटकाळात जिवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपून विशेष कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. तालुक्यातील धाडसी शालेय विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या मुलांचे धैर्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत मान्यवरांनी या वेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपप्राचार्य साईनाथ तोडकर होते. प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा उपव्यवस्थापक तथा आयएमसी सदस्य विश्वेश्वर जोशी उपस्थित होते. आयएमसी सदस्य लक्ष्मण बुद्धलवाड हेदेखील उपस्थित होते.
विश्वेश्वर जोशी यांनी मार्गदर्शन करताना वीर बाल दिवसाचे महत्त्व विशद केले आणि विद्यार्थ्यांना सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली. अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य साईनाथ तोडकर यांनी संस्थेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला कॉलेजमधील शिक्षकवृंद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयटीआय आणि अमृत संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment