उपक्रमाच्या अधिकृत पोस्टरचे बीडमध्ये अनावरण; निबंध, वक्तृत्व, काव्यलेखन, रिल निर्मिती व नाट्यसंहिता लेखन स्पर्धांचे आयोजन
बीड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने १८ ऑगस्ट रोजी थोरले बाजीराव पेशवे जयंती ‘पराक्रम दिन’ म्हणून राज्यभर उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने युवक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी व इतिहास अभ्यासकांसाठी विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमाच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण बीड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश गुरखुदे, नगरसेवक सागर देशपांडे, नगरसेवक शुभम धुत, वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानचे डॉ. अजिंक्य पांडव, प्रा. अभय पटवारी, शुभम जोशी, महेश कुलकर्णी, ॲड. अक्षय भालेराव, विश्वजीत सेलमोकर, रोहित कुलकर्णी, राम काळे, मकरंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमृतचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, मराठा साम्राज्याचे अजिंक्य सेनानी व अद्वितीय रणनितीकार थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रम, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रिल (Reel) निर्मिती स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा तसेच नाट्यसंहिता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या अपराजित पराक्रमाचा गौरव करत युवकांनी इतिहासातून प्रेरणा घेऊन नेतृत्व, राष्ट्रभक्ती आणि कर्तृत्वाची जाणीव जोपासण्याची गरज व्यक्त केली.
“एकही युद्ध न हरलेले सेनानी, अद्वितीय रणनितीकार आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारात मोलाचे योगदान देणारे थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध स्पर्धांच्या माध्यमातून युवकांना इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न आहे,” असे जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी सांगितले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment