महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या वतीने अमृतपेठ हा अभिनव उपक्रम आता तालुका स्तरावर मेहकर येथे प्रथमच आयोजित करण्यात येत आहे
मेहकरमध्ये प्रथमच 'अमृतपेठ – थेट बाजारपेठ'; स्वदेशी उत्पादनांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
बुलढाणा : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) यांच्या वतीने "अमृतपेठ – थेट बाजारपेठ" हा अभिनव उपक्रम आता तालुका स्तरावर मेहकर येथे प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला उद्योजिका, पुरुष उद्योजक, बचत गट, गृहउद्योग, कारागीर आणि स्थानिक उत्पादकांना त्यांच्या स्वदेशी उत्पादनांचे प्रदर्शन व थेट विक्री करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या प्रदर्शनामध्ये राखी व भेटवस्तू, साड्या, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी, बांगड्या, होम डेकोर, कॉस्मेटिक्स, किड्स वेअर, हस्तकला वस्तू, पूजा साहित्य, खाद्यपदार्थ, मसाले, लोणची, पापड, गृहउद्योगातील विविध उत्पादने तसेच अनेक आकर्षक स्वदेशी वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना दर्जेदार उत्पादने थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार असून, स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
'वोकल फॉर लोकल', 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वदेशी खरेदी' या संकल्पनांना बळ देण्यासाठी अमृतपेठ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रदर्शनामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळून महिला व पुरुष उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मोठी मदत होणार आहे. तसेच ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या स्वदेशी व गुणवत्तापूर्ण वस्तू खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
स्टॉल बुकिंगसाठी इच्छुक महिला उद्योजिका, पुरुष उद्योजक, बचत गट, स्वयंरोजगार करणारे युवक-युवती तसेच स्वदेशी उत्पादकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. जिगणेश कमानी यांनी केले आहे. संपर्क : श्री. जिगणेश कमानी जिल्हा व्यवस्थापक, अमृत मो. 9112227637 / 8308998922
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment