जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत विविध शासकीय योजना व सेवांची माहिती; दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर वाटप आणि रक्तदान शिबिराचे आयोजन
कारंजा लाड : नागरिकांना विविध शासकीय सेवा, योजना आणि सुविधांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने कारंजा लाड येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांच्या वतीने नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम आणि उपलब्ध सेवांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांच्या विविध अडचणी व समस्यांवर मार्गदर्शन करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळाला. तसेच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
शिबिरामध्ये महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या विविध योजनांची आणि उपक्रमांची माहितीही नागरिकांना देण्यात आली. यावेळी AMRUT संस्थेचे कर्मचारी श्री. रोहित देशमुख यांनी उपस्थित नागरिकांना अमृतच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय विभागांच्या योजना आणि सेवांची माहिती एकाच छताखाली मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment