अमृत पर्यटनाची अनोखी शैक्षणिक सहल; सोलापूर कार्यालय भेटीत अमृतच्यायोजनांची माहिती
फलटण : अमृत संस्था, सातारा जिल्ह्याच्या वतीने अमृतवर्ग अंतर्गत फलटण ते सोलापूर शैक्षणिक सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पर्यटनाचा आनंद घेत असतानाच ज्ञान, प्रेरणा आणि विकासाच्या विविध संधींची माहिती विद्यार्थी व पालकांना मिळावी, या उद्देशाने ही सहल आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहलीदरम्यान सहभागी विद्यार्थी व पालकांनी अमृत संस्था, सोलापूर कार्यालयाला भेट देत संस्थेच्या विविध उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी सोलापूर जिल्हा व्यवस्थापक श्री. श्रेयस कुलकर्णी, अमृत सखी कु. आर्या कुलकर्णी आणि अमृत सखी सौ. कल्याणी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, शिक्षण, महिला सक्षमीकरण, कुटुंब विकास तसेच विविध शासकीय व समाजोपयोगी योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळवले. यावेळी श्री. श्रेयस कुलकर्णी म्हणाले, "विद्यार्थी आणि पालकांनी प्रत्यक्ष कार्यालयाला भेट देऊन योजनांची माहिती घेणे ही सकारात्मक बाब आहे. अशा उपक्रमांमुळे संस्थेबद्दल विश्वास वाढतो आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींची नवी दृष्टी मिळते. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविण्यासाठी अमृत संस्था सातत्याने कार्यरत आहे." या सहलीचे नियोजन सातारा जिल्हा व्यवस्थापक श्री विनायक पाठकजी व उपव्यवस्थापक श्री. अविनाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी सांगितले, "अमृत पर्यटन ही केवळ फिरण्याची संकल्पना नसून अनुभवातून शिक्षण देणारी एक प्रभावी चळवळ आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी संस्थेचे कार्य जवळून पाहिल्यामुळे त्यांना भविष्यात विविध योजनांचा लाभ घेण्याचा आत्मविश्वास मिळेल. अशा ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी सहली यापुढेही सातत्याने आयोजित केल्या जातील." सहलीनंतर सहभागी विद्यार्थी व पालकांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्याबाबत सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही अशा शैक्षणिक पर्यटन उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही उपस्थितांनी व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment