महाविद्यालयातील शिक्षकांना अमृत संस्थेच्या विविध योजना तसेच C-DAC, NIELIT, CIPET आणि IGTR यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या रोजगाराभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लक्षित गटातील विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यास तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
आर्वी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आर. व्ही. परांकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आर्वी येथे भेट देऊन महाविद्यालयातील शिक्षकांशी संवाद साधण्यात आला. या भेटीदरम्यान अमृत संस्थेच्या विविध योजना, उद्दिष्टे तसेच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या संधींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विदर्भ खादी ग्रामोद्योग प्रमुख अनंताजी झाडे यांनी अमृत संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच C-DAC, NIELIT, CIPET आणि IGTR या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमार्फत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे स्वरूप, पात्रता, कालावधी, रोजगाराच्या संधी तसेच उद्योगाभिमुख कौशल्य विकासाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्ये आत्मसात करण्याची, रोजगाराच्या नव्या संधी मिळविण्याची तसेच स्वयंरोजगाराच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, असे यावेळी सांगण्यात आले. मार्गदर्शनानंतर महाविद्यालयातील शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला. अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ मिळू शकणाऱ्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांची यादी तयार करून देण्याचे तसेच त्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करून त्यांना अमृत संस्था, विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि उपलब्ध योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाविद्यालय आणि अमृत संस्था यांच्या समन्वयातून अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांपर्यंत शासनाच्या कौशल्य विकास व रोजगाराभिमुख योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी पुढील काळातही अशा जनजागृती व मार्गदर्शन उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३२ पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन, वर्धा. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा समावेश आहे. या जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये कार्यरत असून, अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अमृत संस्थेच्या संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी. संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment