गृहउद्योग, लघुउद्योग, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक, कारागीर व विविध व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी ऑनलाइन विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'अमृत पेठ' हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील इच्छुकांनी अमृत पेठवर नोंदणी करून आपली उत्पादने अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी केले आहे.
हिंगोली : स्थानिक गृहउद्योग, लघुउद्योग, महिला बचत गट, शेतकरी, कारागीर तसेच विविध प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री करण्यासाठी 'अमृत पेठ' हे प्रभावी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून उद्योजकांना आपल्या उत्पादनांची व्यापक बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.
अमृत पेठवर नोंदणी केल्यानंतर उद्योजकांना आपल्या उत्पादनांची माहिती, छायाचित्रे, किंमत व इतर आवश्यक तपशील अपलोड करता येणार असून, ग्राहकांना ही उत्पादने ऑनलाइन पाहून खरेदी करता येतील. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना राज्यभर आणि भविष्यात देशभर पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
हिंगोली जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व गृहउद्योग, सूक्ष्म व लघुउद्योग, महिला उद्योजिका, शेतकरी उत्पादक, स्वयंरोजगार करणारे युवक-युवती तसेच विविध व्यवसायिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंगोली जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत गंगाधर धोतरे यांनी केले आहे.
अधिकाधिक उद्योजकांनी अमृत पेठवर नोंदणी करून आपली उत्पादने अपलोड करावीत आणि डिजिटल बाजारपेठेचा लाभ घेत स्वतःचा व्यवसाय अधिक व्यापक करावा, असेही त्यांनी नमूद केले. अमृत पेठच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना नवी ओळख मिळून उद्योजकांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment