घरातील अन्नपूर्णा असलेल्या महिलांपर्यंत एखादी चांगली माहिती पोहोचली की ती संपूर्ण कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत सहज पोहोचते. त्यामुळे महिलांच्या माध्यमातून योजनांचा व्यापक प्रसार होण्यास मदत होते.हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था "अमृत", रायगड जिल्हा कार्यालय, अलिबाग तालुक्यातील थळ या गावी श्री. संतोष सप्रे यांच्या घरी महिलांसाठी "अमृत रानभाजी पदार्थ स्पर्धा २०२६" चे आयोजन काल मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी करण्यात आले होते.
यात दहा महिलांनी भाग घेतला होता. परीक्षक म्हणून श्री. मंगेश खाडीलकर यांनी जबाबदारी उत्तमरीत्या निभावली. या स्पर्धेत श्रीमती सुषमा सप्रे यांना प्रथम क्रमांक, सौ. नीला शेंबेकर यांना द्वितीय क्रमांक तर कल्पना टिल्लू यांना तृतीय क्रमांक मिळाला.
प्रारंभी सौ. वृंदा विनायक मराठे यांनी रानभाजी पदार्थ स्पर्धेचे उद्घाटन केले, तसेच परीक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून अन्नपूर्णा देवी आणि भारतमाता यांना पुष्प अर्पण करून पूजा केली. त्यावेळी उपस्थित महिलांनी जगद्गुरु आद्य शंकराचार्य विरचित अन्नपूर्णास्तोत्राचे पठण केले. सौ. प्रज्ञा दिलीप जोशी यांनी परीक्षकांचा परिचय करून दिल्यावर "अमृत" संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक श्री. मंगेशजी खाडीलकर यांनी खुल्या वर्गातील विविध घटकांतील होतकरू तरुणांसाठी, महिलांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींसाठी संस्थेने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती दिली व त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आपण नोकरी करण्यापेक्षा इतरांना नोकऱ्या देण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी बोलताना जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश विनायक मराठे म्हणाले की, या स्पर्धेचा उद्देश केवळ पाककलेचा वाव देणे नसून अमृत संस्थेच्या योजनांची माहिती समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हाही आहे. घरातील अन्नपूर्णा असलेल्या महिलांपर्यंत एखादी चांगली माहिती पोहोचली की ती संपूर्ण कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत सहज पोहोचते. त्यामुळे महिलांच्या माध्यमातून योजनांचा व्यापक प्रसार होण्यास मदत होते.
त्यानंतर सर्व दहा स्पर्धकांनी आपापल्या पाकपदार्थांची सुंदर व आकर्षक मांडणी केली. परीक्षकांना आपण केलेल्या पाकक्रियेची, त्यात वापरलेल्या रानभाजीची, तिच्या गुणवैशिष्ट्यांसह व औषधी गुणधर्मांसह मौखिक व लिखित माहिती दिली.
स्पर्धेचा निर्णय जाहीर झाल्यावर विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना भेटवस्तू व प्रशस्तिपत्रके देण्यात आली. सौ. प्रज्ञा जोशी यांनी वर्षांतील रानभाज्यांचे आरोग्यसंपन्नतेसाठी तसेच विविध व्याधिनिर्मूलनासाठी दैनंदिन आहारातील स्थान याविषयी सविस्तर माहिती दिली. ज्ञानेश्वर माउलींच्या पसायदान पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेमध्ये रायगड जिल्हा व्यवस्थापक श्री. शैलेश वि. मराठे व उपव्यवस्थापक श्री. मंगेश ढेबे तसेच श्रीमती सुषमा सप्रे, अमृतसखी कु. जान्हवी साठे यांचा सिंहाचा वाटा होता व त्यांना गावातील अन्य महिला भगिनींनी सुद्धा मोलाची मदत केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment