महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण (अमृत) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ईव्ही चार्जिंग स्टेशन (EV Charging Station) उपक्रमाला हिंगोली जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध तालुक्यांतील इच्छुक लाभार्थ्यांनी अमृत जिल्हा कार्यालयाला भेट देऊन योजनेची माहिती जाणून घेतली.
हिंगोली, दि. 21 : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण (अमृत) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ईव्ही चार्जिंग स्टेशन (EV Charging Station) उपक्रमाबाबत माहिती घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून इच्छुक लाभार्थ्यांनी अमृत जिल्हा कार्यालयाला भेट देत चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी जिल्हा कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीची संकल्पना, योजनेचे उद्दिष्ट, पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, आर्थिक बाबी तसेच व्यवसायाच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित लाभार्थ्यांनी विविध शंकांचे निरसन करून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी अमृतचे हिंगोली जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी सांगितले की, वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाला मोठी संधी उपलब्ध होत आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी युवक, महिला, उद्योजक, व्यापारी, पेट्रोल पंप चालक, हॉटेल व्यावसायिक तसेच इच्छुक गुंतवणूकदारांनी पुढाकार घ्यावा.
ईव्ही चार्जिंग स्टेशन योजनेबाबत अधिक माहिती, मार्गदर्शन व अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुकांनी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment